अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार हे भाग्य : खा. सुनिल मेंढे

नवभारताचे स्वप्न साकार करणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पाहण्याचा क्षण विलक्षण होता. खासदार म्हणून हा क्षण अनुभवताना जी अनुभूती आली, ती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या प्रेमामुळेच शक्य झाली असे खासदार सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या आणि अत्याधुनिक अशा इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून हा क्षण डोळ्यात साठविण्याची संधी मिळालेल्या खासदार सुनील मेंढे यांनी या अनुभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. भंडारा गोंदिया मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदारांच्या आशीर्वादाने मिळाली. मतदारांमुळे संसदेच्या सभागृहात पोहोचलेल्या मला अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होण्याचा मान मिळाला. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिराचा निर्णय याच काळात झाला. कश्मीरातील कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचा मी प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार आहे. कल्याणकारी निर्णय सभागृहात घेतली जात असताना माझी उपस्थिती असल्याने खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो.
आज नव्या भारताच्या निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पाऊल असलेल्या नवीन संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले लोकार्पणही याची डोळा पाहण्याचा योग आला. भारतीय संस्कृती, प्रथा, परंपरा यांनी भरलेल्या या सोहळ्यात देशभक्ती ओतप्रोत दिसत होती. हा अनुभव घेण्याची संधी मतदारांमुळे मिळाली यासाठी खऱ्या अर्थाने याचे श्रेय त्यांना द्यायला हवे. खासदार म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक कल्याणकारी निर्णयांचा मी प्रत्यक्ष दर्शी म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो. संसदेची ही नवी इमारत कायम प्रेरणादायी ठरेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


एकीकडे खासदार प्रत्यक्ष हा सोहळा अनुभवत असताना भंडारा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष केला जात होता. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आनंद साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *