कर्ज घ्या, व्यवसाय करा…पण बँकेसोबत प्रामाणिक रहा! केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सल्ला

भंडारा:
केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. वेगवेगळ्या कर्ज योजना व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी आधार ठरीत आहेत. परंतु व्यवसाय चांगला करताना बँकेची प्रामाणिक राहा असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिला.
पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आज भंडारा नगर परिषदेच्या वतीने स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे उपसचिव आशिष बागडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश तईकर, जिल्हा नियोजन अधिकारी सिद्धार्थ मेश्राम उपस्थित होते. यावेळी स्वनिधी योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. कर्ज मंजूर झालेल्या काही लाभार्थ्यांना धनादेश दिले गेले.


यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामविकास साधणाऱ्या असल्याचे सांगितले. कोरोना काळात जेव्हा जग थांबले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळ देऊन लहान मोठे व्यवसायिकांना आर्थिक प्रगती साधनाच्या दृष्टीने आधार दिल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजना सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आदर्श अशा आहेत. पथविक्रेत्यांना सुद्धा त्यांनी दुर्लक्षित केले नाही. त्यामुळेच आज असंख्य व्यवसायिक कोरोनाच्या संकटातही तग धरून होते असे खासदार सुनील मेंढे म्हणाले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्याला आणखी निधी देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी या योजनेअंतर्गत असलेली कर्जाची प्रकरणे ताबडतोब मंजूर करण्याचे निर्देश अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना दिले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम मोदी सरकार ने केले. सक्षम विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न नक्कीच पूर्णत्वास येतील, असेही ते म्हणाले.
महोत्सवा दरम्यान डिजिटल प्रशिक्षणाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. भंडारा नगर परिषद क्षेत्रातील या योजनेचा लाभ घेणारे अनेक लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *